राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरात पार पडला. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला होत असलेल्या विरोधावर भाष्य केलं होतं. “सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काही लोक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करत आहे,” असं विधान मोहन भागवत यांनी केलं. त्यावरून एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांच्यावर टीका केली आहे.

विजयादशमीनिमित्त रेशीम बागेत झालेल्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीसीए (सुधारित नागरिकत्व कायदा) कायद्याबद्दल भाष्य केलं होतं. त्यावरून ओवेसी यांनी काही सवाल उपस्थित करत मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केलं आहे. ओवेसी म्हणाले,”दिशाभूल करायला आम्ही लहान लेकरं नाही आहोत. सीएए व एनआरसी म्हणजे काय याबद्दल भाजपानं कोणतंही भाष्य केलेलं नाही. जर ते मुस्लिमांबद्दल नसेल, तर कायद्यातून सर्व धर्माचे संदर्भ काढून टाकणार का? हे समजून घ्या, आम्हाला भारतीयत्व सिद्ध करायला लावणाऱ्या कायद्यांविरोधात पुन्हा पुन्हा आंदोलन करू,” असा इशारा ओवेसी यांनी दिला आहे.

“धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणाऱ्या कोणत्याही कायद्याचा आम्ही निषेध करू. मला राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगायचं की, आंदोलनावेळी तुम्ही बाळगलेलं मौन विसरलेलो नाही. भाजपाचे नेते सीमांचलच्या लोकांना घुसखोर म्हणत असताना राजद व काँग्रेसनं एकदाही त्यांचं तोंड उघडलं नाही,” असं म्हणत ओवेसी यांनी राजद- काँग्रेसवरही हल्लाबोल केला.

सरसंघचालक नेमकं काय म्हणाले?

“सुधारित नागरिकत्व कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माला विरोध करत नाही. तरीही काही लोक या कायद्याविरोधात निषेध करत आहे. मुस्लीम लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी हा कायदा आणला गेल्याचा खोटा प्रचार करून आपल्या मुस्लीम बांधवांची दिशाभूल करत आहे. त्यामुळेच आंदोलनं केली जात आहेत,” असं मोहन भागवत म्हणाले होते.