पाकिस्तानच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पीएमएल-एनचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात अटक केली आहे. राष्ट्रीय संसदेत विरोधी पक्षनेते असलेले शाहबाज (वय ६७) हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान बंधू आहेत.

पाकिस्तानी नॅबचे प्रवक्ते नवाजिश अली असिम म्हणाले की, शाहबाज शरीफ शुक्रवारी लाहोर येथील नॅबच्या कार्यालयात स्वत: उपस्थित झाले. आशियाना आवास योजना आणि पंजाब स्वच्छ पाणी कंपनीसाठी नियमांचे उल्लंघन करत आपल्या आवडीच्या कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी एवनफिल्ड खटल्यात शाहबाज यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांना १० वर्षांचा कारावास सुनावण्यात आला होता. दरम्यान, त्यांच्या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून २० सप्टेंबरपर्यंत त्यांना जामीन देण्यात आला आहे.