सज्जाद हुसेन, एक्स्प्रेस वृत्तसेवा, इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये जिहादी संघटना आणि संस्कृतीला थारा नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर तेथील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी जागतिक पातळीवर दबाव येत आहे. भारतातील रालोआ सरकारला पाकिस्तानबद्दलचा तिरस्कार या मुद्दय़ावर लोकसभेची निवडणूक जिंकण्याची इच्छा आहे, असे इम्रान खान यांनी येथे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांना सांगितल्याचे वृत्त दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले आहे. भारतातील निवडणूक होईपर्यंत नियंत्रण रेषेवर सुरक्षेचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे देशाने कोणत्याही लष्करी आक्रमणाला सामोरे जाण्यासाठी नेहमीच तयार राहावे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानदिनाच्या कार्यक्रमाला कोणताही प्रतिनिधी न पाठविण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर इम्रान खान यांनी वरील शेरेबाजी केली आहे.

हुरियतच्या नेत्यांना निमंत्रण देण्याचे पकिस्तान उच्चायुक्तालयाने ठरविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्याकडून पाठराखण.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत मैत्रीपूर्ण पवित्रा घेतला. पाकिस्तानसोबत नातेसंबंध सुधारले असून आपण नव्या नेतृत्त्वास भेटण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले.