भारताने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राइकला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. पुलवामा दहशवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने हा एअर स्ट्राइक केला होता. या दहशतवादी हल्ल्यासाठी कुठलं कोडनेम होतं? त्यासाठी काय रणनिती आखण्यात आली होती, त्याचे ऑपरेशनल डिटेल्स आणि इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे.

२६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हवाई दलाचे प्रमुख असणारे बी एस धनोआ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना विशेष आरएएक्स क्रमांकावर फोन केला आणि ‘बंदर मर गया है’ असं सांगितलं. या मेसेजचा अर्थ होता की, सीमेपार जात करण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मद दशतवाद्यांचं बालाकोटमधील ट्रेनिंग कॅम्प भारतीय हवाई दलाच्या विमानांनी उद्ध्वस्त केलं आहे. धनोआ यांनी संरक्षण मंत्र्यांनाही फोन केला होता. त्यावेळी निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होतं.

तर अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन माहिती दिली. जैश-ए-मोहम्मदने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेलं हे उत्तर होतं. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भारताने एअरस्ट्राइक करत शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेत चोख उत्तर दिलं होतं. दोन वर्षानंतर भारताच्या या ऑपरेशनसंबंधी अनेक नवी माहिती समोर आली आहे. ऑप्टिकल गाइडन्स असणारी एका मिसाइल तांत्रिक बिघाडामुळे सुटू शकलं नव्हतं

बालाकोट स्ट्राइकमध्ये सहभाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, बंदर हे नाव या ऑपरेशनसाठी जाणुनबुजून निवडण्यात आलं होतं. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारत बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा उल्लेख करत आहे असं वाटून गोंधळ व्हावा यासाठीच बंदर हा कोड निवडण्यात आला होता. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर तिथेच लपला होता.

पाकिस्तानला या एअर स्ट्राइकची कानोकान खबर लागू नये, बहालवपूरमध्ये हल्ला होणार आहे, असा त्यांचा समज झाला पाहिजे यासाठी राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केलं होतं. जेणेकरुन, पाकिस्तान त्यांच्या हवाई शक्तीचा वापर बहावलपूरच्या दिशेने करेल. जाणूनबुजून पाकिस्तानची दिशाभूल करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली होती. त्याचवेळी हवाई दलाच्या फायटर विमानांनी मिराज-२००० मधून ९० किलो वजनाचे स्पाइस २००० बॉम्ब बालाकोटमधील जैशच्या तळावर टाकले. हा हल्ला झाला, तेव्हा पाकिस्तानी फायटर जेट्स भारताच्या फायटर विमानांपासून १५० किमी दूर होती. भारतीय वेळेनुसार साडे तीन वाजण्याच्या सुमारास मिसाइल्समधून पाच बॉम्ब तळावर टाकण्यात आले. फक्त एक ऑप्टिकल गाइडन्स मिसाइल तांत्रिक बिघाडामुळे सुटू शकलं नव्हतं.

बालाकोटमध्ये फक्त मशिदीला अजिबात धक्का लावण्यात आला नाही. तिथे नमाजची तयारी सुरु झाली होती. स्ट्राइक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व वरिष्ठ मंत्री, पीएमओ अधिकारी, कॅबिनेट सचिव, गृहसचिव, परराष्ट्र सचिव, गुप्तचर यंत्रणा प्रमुख, हवाई दल प्रमुख, रॉ सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत जाहीरपणे भारतीय गुप्तचर यंत्रणा खासकरुन रॉ आणि हवाई दलाच्या प्रमुखांचं अभिनंदन केलं.

मात्र यावेळी राष्ट्रीय सुरक्षेच नियोजन करणाऱ्यांना शेवटची मिसाइल अपयशी ठरल्याची चिंता सतावत होती. कारण ऑप्टिकल गाइडन्सच्या माध्यमातून स्ट्राइकचा पुरावा मिळणार होता, ज्यामुळे पाकिस्तान किंवा पाश्चिमात्य देशापैकी कोणीही स्ट्राइकसंबंधी प्रश्न उपस्थित केला असता भारत तो हाणून पाडू शकला असता. त्याप्रमाणे पाकिस्तानने खोटा प्रचार करत पाकव्याप्त काश्मीरमधील फोटो समोर आणत स्ट्राइक अपयशी ठरल्याचा दावा सुरु केला होता. स्ट्राइक करण्याआधी बालाकोटमध्ये जवळपास ३०० जिहादी उपस्थित होते असं फोटोतून स्पष्ट दिसत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.