दोन देशांमधील कराबाबतचा वाद आणि कर चुकवेगिरी या बाबत जागतिक पातळीवर सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० शिखर परिषदेच्या व्यासपीठावर करणार आहेत.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यानंतर तब्बल २८ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी त्यांचे येथे आगमन झाले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबट यांच्याशी मोदी कॅनबेरा येथे मंगळवारी परस्पर संबंधांवर चर्चा करणार आहेत. बेरोजगारीत वाढ होत असल्याबद्दल भारताला चिंता असून त्याबाबतही मोदी शिखर परिषदेत भाष्य करणार आहेत. रोजगाराभिमुख आर्थिक वाढीसाठी केवळ बाजारपेठेच्या आर्थिक स्थितीवरच नव्हे तर जनतेच्या आयुष्यमानाच्या दर्जावर प्रकाशझोत टाकणे गरजेचे आहे, असे मोदी यांना वाटते.
काळ्या पैशांविरुद्ध आंतराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळणे किती गरजेचे आहे त्यावर प्रकाशझोत टाकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
पुढील पिढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला जी-२० कसा वेग देऊ शकेल, या बाबत चर्चा करण्याचा आपला मानस असल्याचे मोदी म्हणाले.
काश्मीर गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस भेट दिली. संस्थेतील नकाशात काश्मीर भारतात दाखवण्यात आला नाही. परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी यास तीव्र आक्षेप घेतला आहे.

जागतिक योग दिनास युरोपचा पाठिंबा
योगाला जागतिक स्तरावर महत्त्व देण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून आंतरराष्ट्रीय योग दिन संयुक्त राष्ट्रांतर्फे जाहीर करण्यास युरोपीय समुदायाने पाठिंबा दिला आहे. युरोपीय समुदायाचे अध्यक्ष व्हान रॉम्पे यांनी सांगितले  की, मोदी यांच्या विचारास युरोपीय समुदायाचा पाठिंबा आहे. सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेत मोदी यांनी योग दिनाचा मुद्दा मांडला होता.
अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाची चर्चा
जी-२० परिषदेच्या पाश्र्वभूमीवर जपान आणि ऑस्ट्रेलियासह संरक्षण प्रश्नावर चर्चा करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा प्रयत्न आहे. चीनच्या वाढत्या लष्करी ताकदीवर अंकुश ठेवण्यासाठी ही चर्चा होत आहे.
२० विकसनशील देशांनी स्थापलेल्या ‘जी-२०’ संघटनेच्या शिखर परिषदेनिमित्त ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिस्बेन येथे शुक्रवारी युरोपीय मंडळाचे अध्यक्ष हर्मन व्हॅन रॉम्पे यांच्याशी चर्चेआधी हस्तांदोलन केले.