मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे या तरुण नेत्याने काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

कसा आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा प्रवास

– एक जानेवारी १९७१ रोजी ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुंबईमध्ये जन्म झाला.

– ज्योतिरादित्य राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्या कुटुंबाची ग्वालियरमध्ये सत्ता होती.

– ज्योतिरादित्य यांचे वडिल माधवराव शिंदे काँग्रेसमध्ये होते.

– ज्योतिरादित्य यांचे डेहराडूनमध्ये शालेय शिक्षण झाले. १९९३ साली त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून बीए इकोनॉमिक्समध्ये पदवी घेतली.

– २००१ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी MBA ची पदवी घेतली.

– ज्योतिरादित्य ग्वालेहरचे शेवटचे राजे जिवाजीराव सिंधिया यांचे नातू आहेत.

– मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघ हा सिंधिया कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. २००१ साली माधवराव शिंदे यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर गुणा लोकसभची जागा रिक्त झाली.

– १८ डिसेंबरला ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. १९ जानेवारी २००२ रोजी त्यांनी पोटनिवडणुकीसाठी गुणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. २४ फेब्रुवारी रोजी त्यांना तब्बल साडेचार लाखाच्या मताधिक्क्याने प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवारावर विजय मिळवला.

– २००२ ते २०१९ अशी सलग सतरावर्ष ते गुणा लोकसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून आले.

– मागच्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना धक्का बसला. भाजपाच्या कृष्णा पाल सिंह यादव यांनी त्यांचा पराभव केला.

– २००७ साली त्यांचा मनमोहन सिंग मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री बनवण्यात आले.

– २००९ साली ते व्यापार आणि उद्योग राज्यमंत्री झाले. नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांना ऊर्जा राज्यमंत्री बनवण्यात आले.

– २०१९ साली मध्य प्रदेशात तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी ते सर्वात प्रबळ दावेदार होते. पण त्यांच्याजागी काँग्रेसने अनुभवाला प्राधान्य देत कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवले.

– ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. पण तिथे पक्षाचा सपशेल पराभव झाला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.