07 December 2019

News Flash

प्रियंकामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचे पुनरुज्जीवन?

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ७.५ टक्के मते मिळाली होती

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वढेरा यांच्या उत्तर प्रदेश ‘प्रवेशा’मुळे सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ (८०) असलेल्या या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांना कलाटणी मिळू शकेल, असे मानले जाऊ लागले आहे. सप-बसप आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट होणारी लढत आता तिहेरी होणार आहे. २०१४ च्या लोकसभा आणि २१०७ च्या विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झालेल्या काँग्रेसचे उत्तर प्रदेशमध्ये पुनरुज्जीवन होईल, अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ७.५ टक्के मते मिळाली होती. राहुल आणि सोनिया यांचा अनुक्रमे अमेठी आणि रायबरेली हे दोनच मतदारसंघ काँग्रेसकडे राहिले होते. २०१७मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची टक्केवारी घसरून ६.३ टक्क्य़ांवर आली होती. केंद्रातील सत्ता काबीज करण्यासाठी अजूनही उत्तर प्रदेश हेच राज्य भाजप आणि काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. पण, याच राज्यात काँग्रेसचे पुरते खच्चीकरण झाले असल्याने समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने जागा वाटपात काँग्रेसला स्थान दिले नाही. गेल्या वेळी प्रमाणे या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची जागा जिंकण्याची क्षमता नसल्याचे दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाने जागावाटपाची घोषणा करताना अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले होते. मात्र, प्रियंका यांच्या सक्रितेमुळे प्रादेशिक पक्षांना भाजपविरोधी रणनीतीचाही पुनर्विचार करावा लागणार असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

पूर्व उत्तर प्रदेश हा ब्राह्मण आणि ठाकूर या उच्चवर्णीयबहुल प्रदेश असून या दोन्ही जातींच्या मतांवर काँग्रेसची मदार होती. भाजपच्या उच्चवर्णीय आणि कडव्या हिंदुत्ववादी राजकारणामुळे हा मतदार काँग्रेसपासून दुरावला. पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका यांच्याकडे सुपूर्त करून काँग्रेसने पूर्वापार मतदारांना संदेश दिला आहे. प्रियंका यांच्या प्रवेशापूर्वी हे मतदार भाजपसाठी हक्काचे होते मात्र, नव्या राजकीय समीकरणात भाजपच्या उच्चवर्णीय मतदारांमध्ये फूट पडू शकते असे मानले जात आहे. सुमारे अर्धा डझन भाजपचे मंत्री पूर्व उत्तर प्रदेशमधून निवडून आले आहेत.

प्रियंका या आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे आक्रमक असल्यामुळे मोदीसह भाजप नेत्यांना जशास तसे उत्तर देतील. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला भक्कम नेतृत्व मिळू शकेल. सध्या काँग्रेसकडे प्रदेशस्तरावर नेतृत्वाची तसेच, कार्यकर्त्यांची वानवा आहे. मात्र, प्रियंका यांच्या नेतृत्वाचा काँग्रेससाठी मोठा फायदा होईल, असे उत्तर प्रदेशमधील कार्यकत्यार्ंना वाटते. प्रियंका यांच्यामुळे महिला मतदराही मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसकडे आकर्षित होतील, असेही कार्यकर्ते बोलत आहेत. प्रियंका यांच्यामुळे उत्तर प्रदेशात आता तिहेरी लढत होणार आहे. मात्र, त्याचा फटका सप-बसपपेक्षा भाजपला बसू शकतो, असा कयास आहे. दलित-मुस्लिम मतदारांतही विभागणी होणार असली तरी भाजपच्या उच्चवर्णीय मतांमध्ये फूट पडून  जागा  घटू शकतात.

First Published on January 24, 2019 3:07 am

Web Title: priyanka gandhi enters politics to revive congress in up
Just Now!
X