तामिळनाडूच्या अरुप्पूकोट्टई येथील खासगी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थीनींनी आपल्याच कॉलेजच्या महिला प्राध्यापिकेवर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यामुळे तामिळनाडूतील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. निर्मला देवी असे या महिला प्राध्यापिकेचे नाव असून ती गणित विषय शिकवते. सात तास चाललेल्या नाटयानंतर पोलिसांनी तिला घरातून अटक केली.

निर्मला देवी आपल्याला मदुराई कामाराज विद्यापीठाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवायला सांगत होती. त्या बदल्यात चांगले मार्क आणि पैसे मिळतील अशी ऑफर तिने दिली होती असे विद्यार्थींनीचे म्हणणे आहे. निर्मला देवीबरोबर फोनवरुन झालेल्या २० मिनिटांच्या संवादाचे रेकॉर्डींग विद्यार्थींनीनी शेअर केल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या ऑडियो क्लिपममध्ये प्राध्यापिकेने थेट लैंगिक संबंधांचा उल्लेख केलेला नाही. पण विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून मदत हवी असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल असे सांगत आहे.

पदाधिकारी मोठे व्यक्ति असल्यामुळे आपण कोणाचेही नाव घेणार नाही. ही चर्चा गोपनीयच राहिली पाहिजे असे या प्राध्यापिकेने क्लिपमध्ये म्हटले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून निर्मला देवीला तात्काळ निलंबित केले आहे. आयपीसीच्या कलम ३७० अंतर्गत तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यपालांनी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्तीही केली आहे.