एअर मार्शल आर. नंबियार यांचे प्रतिपादन

एस-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली रशियाकडून खरेदी करण्यात येत असून त्यामुळे भारताला शेजारी देशांच्या प्रादेशिक आकांक्षांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळणार आहे. एस-४०० प्रणाली ही ४०० किलोमीटर क्षेत्रातील हवाई लक्ष्यांना नष्ट करू शकते, असे एअर मार्शल आर. नंबियार यांनी सांगितले.

पुढील टप्प्यातील ही प्रणाली अतिशय प्रगत असून ती वेगवेगळ्या ठिकाणी हलवता येऊ शकते, असे सांगून ते म्हणाले,की येत्या २३ महिन्यात ही प्रणाली भारताला मिळणार आहे. नंबियार यांनी या क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी प्रक्रियेत रशियाला भेट दिली होती. अमेरिकेच्या र्निबधांना न जुमानता भारताने ५ ऑक्टोबर रोजी हा करार केला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीवेळी झालेल्या या करारनुसार भारताला ५ अब्ज डॉलर्स किमतीत एस ४०० प्रणालीतील पाच संच मिळणार आहेत. भारताच्या शेजारी देशांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे सीमांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. चीननेही रशियाकडून हीच क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली आहे. भारतही प्रोग्रॅम एडी ही स्वदेशी संरक्षण प्रणाली तयार करत आहे. राफेल विमाने ही चीनच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील चेंगडू  जे २० स्टील्थ बहुउपयोगी विमानांपेक्षा जास्त चांगली आहेत. राफेल विमानांचे उड्डाण आपण स्वत: करून बघितले आहे, असे ते म्हणाले.