सीबीआय म्हणजे गुन्हे अन्वेषण विभाग ही विश्वासार्ह, स्वतंत्र अशी संस्था असून तिचा आदर केलाच पाहिजे, असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज व्यक्त केले. अलीकडेच एका याचिकेवर निकाल देताना गुवाहाटी उच्च न्यायालयाने सीबीआय ही संस्था बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला होता व त्यावर केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या अपिलानंतर गुवाहाटी न्यायालयाच्या निकालास स्थगिती देण्यात आली होती.
जलद कृती दलाच्या एका कार्यक्रमासाठी येथे आले असताना शिंदे यांनी सांगितले, की जेव्हा लोक सत्तेत नसतात तेव्हा ते असे बोलतात. सीबीआय ही विश्वासार्ह व स्वतंत्र संस्था आहे व तिचा आदर केला पाहिजे. देशातील दंगल नियंत्रण व सुव्यवस्था निर्धारण प्रशिक्षणाच्या पहिल्या अकादमीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी असा आरोप केला होता, की सरकार राजकीय उट्टे काढण्यासाठी सीबीआयचा गैरवापर करीत आहे. मुझफ्फरनगर दंगलीनंतर तेथील काही मुस्लीम तरुण हे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होते, या राहुल गांधी यांच्या विधानावर काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे शिंदे यांनी टाळले.
घुसखोरी थांबवण्यासाठी भारताच्या पाकिस्तान व बांगलादेश बरोबरच्या सीमा बंद केल्या जातील, असेही ते म्हणाल़े