बिहार निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवत पुन्हा एकदा राज्याची सत्ता मिळवली आहे. तर, महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावं लागल्याने, त्यांचे बिहारमधील सत्तेचे स्वप्न भंगले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाआघाडीतील पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. राजदचे नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. तर, आता काँग्रेस तारिक अन्वर यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

“शिवानंद तिवारी ज्येष्ठ आहेत आणि असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. काँग्रेस राजद नाही. राजद हा एक प्रादेशिक पक्ष असून त्याचे नेते बिहारपुरते मर्यादित आहेत. राहुल गांधी म्हणाले होते की जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ते बिहारमध्ये येतील आणि त्यांनी तसे केले. ते आरजेडीच्या नेत्यांसारखे काम करू शकत नाहीत.” असं तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे.

तर, या अगोदर “बिहार निवडणूक सुरु असताना राहुल गांधी शिमला येथे गेले होते. सहलीचा आनंद लुटत होते. पक्ष अशा प्रकारे चालवला जातो का? राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाला मदतच होते आहे” असा आरोप शिवानंद तिवारी यांनी केला होता.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या. राहुल गांधींनी फारशा सभाही घेतल्या नाहीत तसंच राहुल गांधी हे बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले होते. प्रियंका गांधी तर बिहारमध्ये फिरकल्याच नाहीत. कारण बिहारशी त्यांचा फारसा परिचय नाही असंही शिवानंद तिवारी म्हणाले होते.

बिहार निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. एनडीएला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, काँग्रेसला १९ जागांवर व डाव्यांना १६ जागांवर विजय मिळता आला आहे.