उत्तर प्रदेशातील बरेलीत भीतीचे वातावरण

येथे एका शिक्षिकेवर राज्य महामार्गालगत सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर कनिष्ठ महाविद्यालयातील पन्नास मुली घाबरल्या असून त्यांना महाविद्यालयात जाण्यास भीती वाटत आहे. स्थानिक युवकांकडून छेडछाड केली जाते, त्यामुळे योग्य सुरक्षा मिळाल्याशिवाय महाविद्यालयात जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद व धनेली येथील काही पालक व मुली शाही पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना भेटल्या व त्यांनी कैफियत सादर केली. स्थानिक युवक मुली दुनका येथील महाविद्यालयात जातात, तेव्हा अश्लील शेरेबाजी करतात अशी त्यांची तक्रार असल्याचे पोलीस स्टेशनचे अधिकारी हरचरण सिंग यांनी सांगितले.याबाबत सामूहिक तक्रार देण्यात आली असून दोन युवकांना अटक करण्यात आली आहे, इतरांचा शोध सुरू आहे. धनेलीचे ग्राम प्रधान नौनेश कुमारी यांनी सांगितले की, त्यांच्या दोन मुलींच्या बाबत असाच छेडछाडीचा प्रकार घडला असून त्यांनी पोलीस सुरक्षा मिळेपर्यंत महाविद्यालयात जाण्यास  नकार दिला आहे. बरेलीचे पोलीस उप अधीक्षक आशुतोष कुमार यांनी सांगितले की, ही बाब आमच्या निदर्शनास आणण्यात आली असून महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गात साध्या वेशातील पोलीस ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद कुमार  यांनी बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मुलींच्या तक्रारीबाबत पत्र लिहिले आहे. एका महिला शिक्षिकेवर भर दिवसा दिल्ली-लखनौ महामार्ग क्रमांक २४ लगतच्या शेतात नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. बुलंदशहरच्या मायलेकीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच इतर ठिकाणीही ही स्थिती आहे. सदर महिला शिक्षिकेस तीन गुन्हेगारांनी मोटारीत खेचून पळवून उसाच्या शेतात नेले, तेथे सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रण केले. नंतर महिलेला तेथेच टाकून दिले. सीबीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खादुआ रस्त्यावर ही घटना घडली होती.