प्राण्यांनी एकाच वेळी अनेक पिलांना जन्म दिल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र, मनुष्य प्राण्याने एकाच वेळी अनेक मुलांना जन्म देण्याची घटना विशेष ठरते. त्यामुळे एखाद्या महिलेने जुळ्यांना किंवा जास्तीत जास्त तिळ्यांना जन्म दिल्याचं आपण ऐकलंही असेल. मात्र, राजस्थानमधील एका महिलेने तब्बल पाच मुलांना एकाच वेळी जन्म दिला आहे. ही घटना घडल्यानंतर याची माहिती वाऱ्यासाऱखी रुग्णालयाच्या बाहेर पसरली मात्र, यावर तत्काळ कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नव्हते.

राजस्थानची राजधानी जयपूरमधील जनाना रुग्णालयात शनिवारी सकाळी ही आश्चर्यकारक घटना घडली. एकाच वेळी पाच मुलांचा जन्म झाल्याचे पाहून रुग्णालयातील डॉक्टरही आवाक झाले. ही घटना दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, रुक्साना नामक एका महिलेने शनिवारी सकाळी ८.१४ मिनिटांनी पाच मुलांना जन्म दिला. यामध्ये तीन मुलगे आणि दोन मुली आहेत. मात्र, दुर्देवानं यातील एक मुलगा दगावलेला होता. दरम्यान, इतर चारही अर्भकांचे आणि त्यांच्या आईचे आरोग्य उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या महिलेचा पती कालू याने सांगितले की, डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतरच आम्हाला पाच मुलं होणार असल्याची कल्पना दिली होती.

दरम्यान, एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिल्याची माहिती रुग्णालयात पसरल्यानतंर सर्वत्र याचीच या घटनेवरच बोलले जात होते. रुग्णालयातील रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्येही याची मोठी चर्चा रंगली होती.