करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दिलेला इशारा धुडकावून बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान केले.

सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करून दुसऱ्या शाहीस्नानालाही साधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे साधूंनी तिसरे शाहीस्नान करून मेष संक्रांत आणि बैशाखी सण साजरा केला. दुपारपर्यंत आठ ते दहा लाख भाविकांनी नदीत स्नान केले, असे उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोककुमार यांनी सांगितले.

या वेळी चार ते १३ आखाड्यांमधील साधूंनी स्नान केले, तिसऱ्या शाहीस्नानाला गंगा घाटावर अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती, मेळ्याच्या ठिकाणी पोलीस मुखपट्ट्यांचे वाटप करीत असल्याचेही पाहावयास मिळाले. तथापि, सामाजिक अंतराचे नियम साधूंनी खुलेआम धुडकावल्याचे दिसत होते. यापैकी बहुसंख्य जणांनी मुखपट्ट्यांचा वापर केला नसल्याचे तसेच अंतरनियम पाळले नसल्याचे पाहावयास मिळाले.