दिल्लीच्या किराडी भागात मध्यरात्री एका कापड गोदामाला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते मोठ्या प्रयत्नांनंतर अग्निशामन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीच्या किराडी भागातील कापड गोदामाला सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता आग लागली. संपूर्ण गोदाम कपड्यांनी भरलेले असल्याने या आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. दरम्यान, यामध्ये सुरुवातीला तीन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले होते त्यांच्यापैकी सात जणांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर तिघांवर अद्याप उपचार सुरु आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेले सर्वजण कामगार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भीषण आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानीबरोबरच आर्थिक नुकसानही झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आगीचे कारण शोधण्याचे काम दिल्ली पोलीस करीत आहेत.

महिन्याभरात दिल्लीमध्ये विविध ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला अनाज मंडी भागात लागलेल्या अशाच आगीत ४४ जणांचा मृत्यू झाला होता. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. त्यानंतर घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग मोठ्या भागावर पसरली होती.

त्यानंतर हप्त्याभरापूर्वी दिल्लीच्या मुंडका बागात एका प्लायवूडच्या फॅक्टरीला आग लागली होती. तसेच शालीमार बाग येथेही आग लागली होती. या आगीत ३ महिलांचा धुराने श्वास कोंडला गेल्याने मृत्यू झाला होता. त्याचबरोबर याच भागात एका चार मजली इमारतीलाही आग लागली होती.