भगवी वस्त्र परिधान करणारे मंदिरांमध्ये बलात्कार करत आहेत असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे वाचाळवीर अशी ओळख असलेले दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दिग्विजय सिंग यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ” भगवी वस्त्र परिधान करुन देशातल्या मंदिरांमध्ये बलात्कार केले जात आहेत. ज्यांनी आपल्या सनातन हिंदू धर्माची अशा कृत्यांमुळे बदनामी केली आहे त्या सगळ्यांना देव कधीही माफ करणार नाही ” असंही दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.

 

“भगवी वस्त्र परिधान लोक चूर्ण विकतात, भगवी वस्त्र परिधान करुन मंदिरांमध्ये बलात्कार केले जात आहेत. हाच आपला सनातन हिंदू धर्म आहे का? जे अशा पद्धतीने सनातन धर्माची बदनामी करत आहेत त्यांना देव कधीही क्षमा करणार नाही.” असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.

भोपाळमध्ये साधूंना संबोधित करताना दिग्विजय सिंग यांनी हे वक्तव्य केलं आहे. ” एखादा माणूस आपलं कुटुंब सोडून साधू होतो, धर्माचं आचरण करत अध्यात्माकडे वळतो. मात्र आजच्या घडीला भगवी वस्त्र परिधान करुन काही लोक चूर्णही विकतात. या सगळ्यामुळे सनातन धर्माची बदनामी होते आहे. याआधीही दिग्विजय सिंग यांनी अशीच वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.

आयएसआयकडून पैसे घेणारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पैसे घेणारे लोक एकच आहेत असं ते म्हटले होते. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे जे कोणी लोक आहेत ते बजरंग दल, भाजपा आणि आयएसआय यांच्याकडून पैसे घेत आहेत असं वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. तसंच लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपावरही निशाणा साधला होता. आता राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी भाजपाकडून केल्या जात आहेत. १९४७ च्या आधी यांच्यापैकी कोण होतं? असा प्रश्न दिग्विजय सिंग यांनी विचारला होता. ज्यावरुन चांगलाच वादही रंगला होता. आता भगव्या कपड्यांवर वक्तव्य करत त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.