आता केबल आणि डीटीएच वापरकर्ते 130 रुपयांच्या ( जीएसटीसह 153.40 पैसे) पॅकमध्ये 100 निःशुल्क किंवा शुल्क असलेल्या वाहिन्या पाहू शकतात. यापूर्वी अशाप्रकारचा पर्याय नव्हता. यासाठी 31 जानेवारीपर्यंत ग्राहकांना आपल्या आवडीच्या 100 वाहिन्यांची निवड करणं आवश्यक आहे, कारण 1 फेब्रुवारीपासून हे नवे नियम लागू होतील असे आदेशच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोणत्याही वाहिनीची किंमत 19 रुपये प्रतिमहिन्यापेक्षा जास्त नसावी असंही ट्रायने स्पष्ट केलं आहे.

ट्रायच्या म्हणण्यानुसार सुरूवातीच्या 100 वाहिन्यांमध्ये (बेस पॅक) एचडी वाहिन्यांचा समावेश नसेल, पण काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये एचडी वाहिन्यांचाही समावेश असणार आहे, मात्र एक एचडी वाहिनी म्हणजे दोन साध्या वाहिन्या असं समीकरण असेल. याबाबत ग्राहकांनी आपआपल्या सेवा पुरवठादारांशी संपर्क साधून योग्य ती माहिती घ्यावी. योग्य माहिती मिळत नसल्यास ग्राहक 011-23237922 ( ए.के.भारद्वाज), 011-23220209 ( अरविंद कुमार) या क्रमांकांवर फोन करु शकतात, किंवा advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gov.in या इमेल आयडीवर मेल करुन माहिती जाणून घेऊ शकतात.

सध्या केबल ऑपरेटरकडून प्रत्येक महिन्याला 250 ते 450 रुपये भाडं आकारलं जातं. यामध्ये 450 हून जास्त चॅनल दाखवले जातात. पण आता ग्राहकांना 130 रुपयांत(जीएसटीसह 153.40 पैसे) 100 चॅनल पाहायला मिळणार आहेत.  चॅनेलचा दर कमीत कमी 50 पैसे तर जास्तीत जास्त 19 रुपये असणार आहे. याचा अर्थ जर तुम्ही 19 रुपये दर असणारे 10 चॅनल घेतले तर तुम्हाला 130 अधिक 190 रुपये म्हणजेच 220 रुपये भरावे लागतील.
उदाहरणार्थ – तुम्हाला झी मराठी चॅनल पहायचं असल्यास बेस पॅक 130 रुपये आणि झी मराठीचे 19 रुपये असे एकूण 149 रुपये द्यावे लागतील. किंवा तुम्हाला कलर्स मराठी, सोनी मराठी आणि झी मराठी चॅनल हवा असल्यास बेस पॅकचे 130 रुपये आणि अनुक्रमे चॅनलचे 17, 10 आणि 19 रुपये याचा अर्थ 146 रुपये भरावे लागतील.