सीमारेषेवरील पुंछ सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या दोन ‘एसएसजी’ (स्पेशल सर्विस ग्रुप) कमांडोंचा खात्मा करण्यात यश आले आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या ‘बॅट’ (बॉर्डर अॅक्शन टीम) चा हल्ला परतवून लावण्यात आला आहे. या चकमकीत एक भारतीय जवान देखील शहीद झाला आहे.

दोन्ही बाजूंनी रॉकेट लाँचर आणि अँटीटँक मिसाईलाच देखील मारा करण्यात आल्याची माहिती, लष्कराच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तानच्या एसएसजी कमांडो आणि सैन्याने सुंदरबनी सेक्टरमधील नथुआ का तिब्बा येथील एका पोस्टवर हल्ला केल्यानंतर या चकमकीस सुरूवात झाली होती.

पाकिस्तानकडून हल्ला केल्याचे लक्षात येताच भारतीय जवानांकडून देखील, त्यांच्या हल्लास चोख प्रत्युत्तर देण्यात आले व त्यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले. या चकमकीत भारताचे जवान सुखविंदरसिंग यांना गोळी लागल्याने ते घटनास्थळीच शहीद झाले. भारतीय लष्कारास मिळालेल्या माहितीवरून या गोळीबारात पाकिस्तानचे दोन कमांडो ठार झाले आहेत. यानंतर सीमारेषेवर अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.