लंडन : नाताळ तोंडावर असताना ब्रिटनमध्ये झालेल्या नाटय़मय सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बहुमताने सत्ता राखली. ब्रिटनमधील राजकीय अस्थिरता या निकालाने संपुष्टात आली असून आता युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा मार्ग (ब्रेग्झिट) सुकर झाला आहे. हुजूर पक्षाला ३६४ तर मजूर पक्षाला २०३  जागा मिळाल्या.  मजूर पक्षाच्या पारंपरिक मतदारसंघातही हुजूर पक्षाने नेत्रदीपक विजय संपादन केला हे निकालाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरले.

१९८० मध्ये मार्गारेट थॅचर यांना जसे बहुमत मिळाले होते तशाच विजयाची पुनरावृत्ती करीत ३६० हून अधिक जागा जॉन्सन यांनी जिंकल्या. पुढील महिन्यात ब्रिटनला युरोपीय समुदायातून बाहेर काढण्यासाठी लोकांनी हा कौल दिला आहे.  जॉन्सन यांनी सांगितले की, दुसऱ्या जनमताचा धोका आता संपुष्टात आला आहे. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाकडून ‘गेट ब्रेग्झिट डन’ हे घोषवाक्य वारंवार म्हणून घेतले. यावेळी लोकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.

मजूर पक्षाचे सत्तर वर्षीय नेते जेरेमी कोर्बिन यांनी सांगितले की, यापुढे कुठल्याही निवडणुकीत आपण नेतृत्व करणार नाही. ब्रेग्झिटबाबत कुठलीही स्पष्ट भूमिका घेण्यात अपयशी ठरल्याने हा पराभव झाल्याचे खापर कोर्बिन यांच्यावर फोडण्यात आले आहे.

मतदानोत्तर चाचण्यात रात्री दहा वाजता जॉन्सन यांच्या विजयाचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते त्यात हुजूर पक्षाला ३६८ जागा मिळतील व मजूर पक्षाला १९१ जागा मिळतील असा अंदाज दिला होता. आम्हाला बहुमताची गरज होती त्यामुळे ही निवडणूक अटीतटीने लढवली गेली, असे भारतीय वंशाच्या मंत्री प्रीती पटेल यांनी यावर म्हटले. ब्रेग्झिट व इतर अग्रक्रम  या दोन्ही गोष्टी पार पाडण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. त्यावर आम्ही पुढे जाऊ  असे त्यांनी स्पष्ट केले.

जॉन्सन यांनी निवडणुकीच्या प्रचारात ‘गेट ब्रेग्झिट डन’ या मुद्दय़ावर भर दिला होता. त्यांनी ३१ जानेवारी २०२० या मुदतीत ब्रिटनला युरोपीय समुदायातून बाहेर काढण्याचा शब्द लोकांना दिला. याउलट मजूर पक्षाचे नेते कोर्बिन यांनी मतदारांना पुन्हा जनमताचे आश्वासन दिले होते. फेरवाटाघाटीतून ब्रेग्झिट व युरोपीय समुदायात राहणे असे दोन पर्याय त्यांनी दिले पण  त्यांच्या प्रचाराचा मूळ भर हा अर्थसंकल्पात सार्वजनिक सेवा व राष्ट्रीय आरोग्य सेवेवर भर देऊन इतर बाबींवरचा खर्च कमी करण्याच्या  मुद्दय़ावर होता.

मजूर पक्षाची मते २०१७ च्या तुलनेत ८ टक्के कमी झाली तर हुजूर पक्षाची मते १ टक्का वाढली. लिबरल डेमोक्रॅट नेत्या जो स्विन्सन या डनबार्टनशायर पूर्व येथून पराभूत झाल्या. डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पार्टीचे नेते निगेल डॉडस वेस्टमिनस्टर येथून पराभूत झाले.

ब्रेग्झिटचा तिढा सोडवण्यासाठी ही नवी पहाट झाली आहे. मतदारांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो वाया जाऊ देणार नाही. नागरिकांनी हुजूर पक्षाला ब्रेग्झिटसाठी मोठे बहुमत दिले आहे हे खरेच, पण देशात एकजूट निर्माण करून प्रगती करण्यासाठीही लोकांनी हा कौल दिला आहे 

 – बोरिस जॉन्सन, पंतप्रधान, ब्रिटन

निकालाची वैशिष्टय़े आणि परिणाम

* हा निकाल हुजूर पक्षासाठी महत्त्वाचा आहेच शिवाय त्यातून राजकीय अस्थिरताही संपली

* पुढील महिन्यात ब्रेग्झिटची वाट सोपी झाली.

* मजूर पक्षाचे नेते कोर्बिन यांनी पुढची निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले पण इतरांच्या अपेक्षेप्रमाणे लगेच पायउतार होण्यास नकार दिला.

* स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या नेत्या निकोला स्टरजिऑन यांना चांगले यश मिळाले. स्कॉटलंडला युरोपीय समुदायातून  बाहेर काढण्यासाठी हा कौल नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

* मजूर पक्षाच्या डार्लिग्टन, सेजफिल्ड, वर्किंग्टन मतदारसंघात प्रथमच हुजूर पक्षाचे खासदार

* पंतप्रधान जॉन्सन सोमवारी मंत्रिमंडळात किरकोळ फेरबदल करणार

* २० डिसेंबरला विथड्रॉवल अग्रीमेंट बिल पुन्हा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांडणार

* पाच वर्षांतील तिसरी निवडणूक,  शंभर वर्षांत डिसेंबरमधील पहिली निवडणूक

भारतीय वंशांच्या मतदारांची भूमिका..

मजूर पक्षाने काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचे आवाहन करणारा ठराव मंजूर करून भारतविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे काही पारंपरिक मतदारसंघात भारतीय ं वंशाच्या मतदारांनी त्यांना हिसका दाखवला. मजूर पक्षाचे अनेक बालेकिल्ले हुजूर पक्षाने हादरवले. त्यात उत्तर इंग्लंड, मिडलँडस व वेल्स या भागांचा समावेश आहे. या भागात २०१६ च्या ब्रेग्झिटमध्ये युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी लोकांनी मोठय़ा प्रमाणात  कौल दिला होता.