वॉशिंग्टन : ग्रीनकार्ड अर्जदारांच्या संख्येवरील सात टक्क्य़ांची मर्यादा उठवणारे विधेयक संमत करण्याच्या निर्णयाचे अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचा फायदा भारतासह अनेक देशातील बुद्धिमान लोकांना होणार असून त्यांना अमेरिकेचे स्थायी नागरिकत्व मिळणार आहे.

अमेरिकी प्रतिनिधिगृहाने हे विधेयक बुधवारी संमत केले असून त्यात ग्रीनकार्ड धारकांवरील सात टक्क्य़ांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. हजारो बुद्धिमान व्यावसायिक लोक ग्रीनकार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत असून त्यात भारतीयांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. ग्रीनकार्ड मिळणे याचा अर्थ अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी परवानगी मिळणे असा आहे. त्याच्या माध्यमातून अमेरिकी नसलेल्या लोकांना अमेरिकेत कायम राहून काम करण्याची परवानगी दिली जाते.

स्थलांतर व नागरिकत्व उपसमितीचे अध्यक्ष झो लॉफग्रेन यांनी सांगितले,की अमेरिकी उद्योगांना स्पर्धात्मकतेत टिकण्यासाठी  बुद्धिमान लोकांना संधी द्यावी लागणार आहे. ग्रीनकार्डच्या माध्यमातून हे लोक अमेरिकेकडे आकर्षित होतील. जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांसाठी व्हिसा मर्यादा असल्याने अनेकांना संधी मिळत नव्हती. कमी लोकसंख्येच्या देशातील जास्त लोकांना ती मिळत होती. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे विधेयक मांडले हे कौतुकास्पद असून या विधेयकामुळे उद्योग विकास व अमेरिकेच्या आर्थिक विस्तारास चालना मिळणार आहे, असे अमेरिकी काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले. या विधेयकामुळे सर्वाना समान संधी मिळाली असून यात अमेरिकी कंपन्यांना फायदा होईल तसेच येणारे बुद्धिमान कर्मचारी त्यांच्या कुटुंबापासून दुरावणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

रोजगारातील अनेक वर्षांचा  अनुशेष यातून भरून येणार आहे, असे काँग्रेस सदस्या प्रमिला जयपाल यांनी सांगितले. भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक कर्मचाऱ्यांना अमेरिकेतील सध्याच्या स्थलांतर धोरणाचा मोठा फटका बसला असून कायम वास्तव्यासाठीच्या ग्रीनकार्डवर सात टक्क्य़ांची मर्यादा होती.