अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात चर्चेची शेवटची फेरी आज पार पडली. जो बायडेन यांनी यावेळी कोणत्याही देशाने निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, “मी हे स्पष्ट करु इच्छितो की, कोणीही असो जर अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला तर मोठी किंमत चुकवावी लागेल”. चर्चा पर पडण्याच्या एक दिवस आधी अमेरिकन प्रशासनाकडून रशिया आणि इराण ३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा दिला होता.

याआधी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. यावर अनेकदा अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी असे काहीही नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र अमेरिकेची गुप्तचर संस्था CIAच्या एका अधिकाऱ्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांनी व्यक्तिगतरित्या अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला असल्याचा खुलासा केला होता.

निवडणुकीत करोनादेखील प्रमुख मुद्दा असून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण केलेल्या कामिगरीबद्दल अनेक देशांच्या प्रमुखांनी आपलं कौतुक केलं असल्याचं यावेळी ते म्हणाले. यावर जो बायडेन यांनी एका प्रसिद्ध जर्नलने मात्र उचलण्यात आलेलं पावलं दुर्दैवी असल्याचं म्हटलं असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.