आसाममध्ये मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरामुळे हाहाकार माजला असून काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांना याचा मोठा फटका बसला असून ते आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेत आहेत. पुरामुळे इथे एका गेंड्याचा मृत्यू झाला आहे तर जीव वाचवण्यासाठी इथल्या एका घरात पलंगावर एक वाघ आरामत बसल्याचे पाहून या घरातील लोकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.

घरामध्ये वाघाचे दर्शन झाल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला वर्दी दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, एका कर्मचाऱ्याने या वाघाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली. वाघाचा हाच फोटो वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियातून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. युजर्सने या फोटोवर अनेक कमेंट्सही दिल्या आहेत.

युजर्सचे म्हणणे आहे की, पुरापासून बचाव करताना घरात जाऊन बसलेला हा वाघ खूपच थकलेला आणि भुकेला दिसत आहे. वन विभागाने सांगितले की, वाघाला शांत करण्यासाठी आणि त्याला घरातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

आसाममध्ये अद्यापही पुराचा कहर सुरुच असून राज्यातील २९ जिल्ह्यांमधील परिस्थिती बिकट बनली आहे. पुरामध्ये आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून ५७ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या गुवाहाटीसहित अनेक भागातून धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत.