काठमांडू : संपूर्ण नेपाळभरात मुसळधार पावसामुळे झालेले भूस्खलन आणि पूर यात गेल्या आठवडय़ात किमान १८ जण मरण पावले असून २१ जण बेपत्ता आहेत, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

नेपाळला गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने तडाखा दिला. यामुळे सर्वत्र पूर आले आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. प्रचंड पावसामुळे नद्यांना पूर आले असून त्यामुळे व्यापक नुकसान झाले आहे. नेपाळ पोलीस, लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलांमार्फत मदत व बचाव कार्य सुरू आहे.

संपूर्ण देशभरात गेल्या आठवडय़ात ४ महिला व ३ मुलांसह १८ जण मरण पावले असल्याची माहिती नेपाळ पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिली.

काठमांडूच्या पूर्वेला ३० किलोमीटरवर असलेल्या सिंधुपालचौक जिल्ह्य़ात भूस्खलन आणि पूर यामुळे ४ जण मरण पावले. डोटी येथे ३, तर सप्तारी, कावरे, गोरखा, कास्की, अर्घाखाची, पाल्पा, प्युथान, जुमला, कालिकोट, बझांग व बाजुरा जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी १ जण मरण पावल्याचे त्यांनी सांगितले.