दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. ते १५ एप्रिलपर्यंत कोठडीत असतील. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असल्याची चर्चा आहे. अरविंद केजरीवाल यांना त्यांचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं तर या पदावर कोण बसणार? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. सोशल मीडियावरील चर्चेनुसार अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आतिशी मार्लेना यादेखील मुख्यमंत्री बनू शकतात.

दरम्यान, आम आदमी पार्टीच्या ५५ आमदारांनी आज (२ एप्रिल) दुपारी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी सर्व आमदार सुनीता केजरीवाल यांना म्हणाले, दिल्लीतले २ कोटी रहिवासी केजरीवाल यांच्या पाठिशी उभी आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये. त्यांनी तुरुंगातूनच दिल्लीचं सरकार चालवावं. आपचे एकूण ५५ आमदार सुनीता यांना भेटले तर ४ आमदार सध्या दिल्लीत नसल्यामुळे आज या भेटीसाठी जाऊ शकले नाहीत.

दिल्ली सरकारच्या कथित मद्यविक्री घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस जिल्हा न्यायालयाने सोमवारी (१ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘आप’चे नेते आणखी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर गंभीर आरोप केले. आतिशी म्हणाल्या की, भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधण्यात आला. मी पक्षात आले नाही तर एका महिन्याच्या आत मला ईडीकडून अटक करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. माझ्या सहकाऱ्याशी संपर्क साधून हा प्रस्ताव देण्यात आला आहे. ती व्यक्ती (संपर्क करणारी) मला म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे ‘आप’ला नष्ट करू इच्छितात. परंतु, आम्ही भाजपाच्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही आमचं काम करत राहू. ‘आप’च्या आणखी चार नेत्यांना अटक करण्याचे षडयंत्र भाजपाकडून आखण्यात येत आहे.

हे ही वाचा >> “ते चीनचं नाव घ्यायलाही घाबरतात”, परराष्ट्रमंत्र्यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर काँग्रेसचा संताप

दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आधीच तुरुंगात धाडलेले आहे. भाजपा आणखी चार नेत्यांना तुरुंगात डांबण्याचं रचत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे. आतिशी म्हणाल्या, “माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांना अटक केली जाऊ शकते. दरम्यान, संजय सिंह यांना काही वेळापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला आहे.