दिल्लीतील मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मेट्रोमध्ये पाकीटमारी करणाऱ्या भुरटय़ा चोरटय़ांमध्ये तब्बल ९४ टक्के महिला चोर असल्याचे उघडकीस आले आहे. मेट्रोची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकाने जानेवारी ते मार्च २०१४ या कालावधीत केलेल्या कारवाईत १२६ पाकीटमारांना पकडण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये ११८ महिला पाकीटमारच असल्याचे समोर आले आहे.
मेट्रोमध्ये पाकीटमारी करताना या महिलांकडून विशेष कार्यपद्धती अवलंबिली जाते. या महिला लहान मुलांना कडेवर घेऊन गाडीत चढतात आणि लोकांचे लक्ष नाही असे पाहून खास करून महिला प्रवाशांनाच अधिक लक्ष्य करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली, गुरवा, फरिदाबाद, नोएडा, गाझियाबाद आदी भागांत मेट्रोची १३४ स्थानके आहेत. जलद प्रवासासाठी नागरिकांकडून मेट्रोचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. या गर्दीचा फायदा घेऊन मोठय़ा प्रमाणात पाकीटमारी केली जात असल्याचे आढळून आले, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी मेट्रोच्या विविध स्थानकांवर ४६६ पाकीटमारांना पकडण्यात आले. त्यामध्ये ४२१ केवळ महिलाच होत्या, तर उर्वरित ४५ पुरुष पाकीटमार होते. त्यामुळे पोलिसांनी मेट्रोतील  महिला पाकीटमारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.