दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर (जेएनयू) काही दिवसांपूर्वी टीकास्त्र सोडणारे भाजप आमदार ज्ञानदेव अहुजा पुन्हा एकदा वादाच्या गर्तेत सापडण्याची शक्यता आहे. नेहरू आणि गांधी परिवारातील व्यक्तींचे पुतळे खाली पाडले पाहिजेत. लोक या पुतळ्यांवर थुंकतील, असे वादग्रस्त वक्तव्य अहुजा यांनी केले आहे. याशिवाय, अहुजा यांनी पुन्हा एकदा ‘जेएनयू’लाही लक्ष्य केले आहे. जेएनयू हे गुन्हेगारी घडामोडींचे केंद्र असून याठिकाणी दररोज बलात्कार होतात, असे ज्ञानदेव अहुजा यांनी सांगितले.
यापूर्वी जेएनयूतील राष्ट्रद्रोही घोषणांच्या वादानंतर टीका करताना अहुजा यांनी जेएनयू हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून, येथे रोज ३ हजार वापरलेले कंडोम मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. जेएनयूच्या परिसरात रोज ३ हजार वापरलेले कंडोम, २ हजार दारुच्या रिकाम्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी ५०० इंजेक्शन, ५० हजार हाडांचे तुकडे आणि १० हजार सिगारेटचे तुकडे मिळत असल्याचा आरोप अहूजा यांनी केला होता. याशिवाय, जेएनयूचे विद्यार्थी हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘नग्न नृत्य’ करीत असतात, असाही आरोप त्यांनी केला होता.