किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भारत सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर किर्गिस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये, अशी सुचना भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी भारतीय दुतावासाच्या संपर्कात राहावे, असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भारतीय दुतावासाकडून संपर्क क्रमांकही जारी करण्यात आला आहे. किर्गिस्तानमध्ये सद्यस्थिती १५ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय दुतावासाने नेमकं काय म्हटलंय?

बिश्केक येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर भारतीय दुतावासाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत भारतीय विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. “बिश्केकमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. आम्ही तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. तिथे तणावपूर्ण शांतता असली तरी भारतीय विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये, अशी सुचना आम्ही त्यांना दिली आहे, असे भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. तसेच त्यांनी मदतीसाठी संपर्क क्रमांकही जारी केला आहे. विद्यार्थ्यांना काही मदत हवी असल्यासे त्यांनी ०५५५७१००४१ या क्रमांकावर संपर्क करावा”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – भारत-मालदीव संबंधांचा विकास परस्पर हितसंबंध, संवेदनशीलतेवर आधारित; परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचे प्रतिपादन

विदेशमंत्री एस. जयशंकर म्हणाले…

याबरोबरच विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय विद्यार्थ्यांना दुतावासाच्या संपर्कात राहण्याची सुचना केली आहे. “बिश्केकमधील परिस्थितीवर आम्ही लक्ष्य ठेऊन आहोत. तेथील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मी भारतीय विद्यार्थ्यांनी विनंती करतो की त्यांनी भारतीय दुतावासाच्या संपर्कात रहावे”, असे ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

१३ मे रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमधील एका वसतिगृहात विदेशी आणि स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी काही स्थानिक विद्यार्थ्यांना अटकही केली. मात्र, खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्याचे म्हणत इतर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या खोलीत जाऊन तोडफोड केली होती. तसेच काही विद्यार्थिनींशी गैरवर्तनही केले.

हेही वाचा – व्यापारी मार्ग उभारणीनंतर कृषिमाल पुरविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

भारताप्रमाणेच पाकिस्तानकडूनही सुचना जारी

या घटनेनंतर भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही त्यांच्या विद्यार्थ्यांना घरात राहण्याच्या सुचना केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही सोशल मीडिया पोस्टद्वारे या हल्ल्यात तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. दरम्यान, किर्गिस्तान सरकारने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आम्हाला कोणाच्याही मृत्यूची माहिती मिळाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच येथील परिस्थिती नियंत्रणात असून बिश्केकमध्ये पोलिसांनाचा अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After violent protests in bishkek india asks students in kyrgyzstan to stay indoors spb