अमृतसर : ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी येथील सुवर्णमंदिरात झालेल्या कार्यक्रमात अकाल तख्तचे मुख्य धर्मगुरू ग्यानी हरप्रीतसिंग यांनी पंजाबमधील ग्रामीण भागातील चर्चबद्दल आक्षेप, शीख युवकांना आधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण आदींबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली.

जथेदार ग्यानी हरप्रीतसिंग यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही आरोप केले. ते म्हणाले की, नेहरू यांनी देशात शीखविरोधी धोरण राबविले. त्यातूनच १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार घडले.

अकाल तख्त साहिब येथे झालेल्या या कार्यक्रमात खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. जथेदार म्हणाले की, आम्हाला धार्मिकदृष्टय़ा कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे. पंजाबमधील गावांमध्ये चर्च स्थापन केले जात आहेत. आता शीख धर्माच्या रक्षकांनी आता वातानुकूलित खोल्यांतून बाहेर पडून धर्मरक्षणासाठी गावांकडे जाण्याची वेळ आली आहे. जर आम्ही धार्मिकदृष्टय़ा, आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा समर्थ झालो नाही तर राजकीयदृष्टय़ाही कमकुवत राहू.   

पंजाबमधील युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, पंजाबमधील युद्धकला गतका शिकवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभी करण्याबरोबरच आधुनिक नेमबाजी सराव केंद्रेही उभारली पाहिजेत. काही जण हे प्रशिक्षण लपूनछपून देत असले तरी आम्ही ते उघडपणे देऊ. युवकांना व्यसनांतून बाहेर काढून शस्त्रांचे प्रशिक्षण द्यावे, शिक्षण द्यावे, जेणेकरून ते विविध देशांच्या अर्थव्यवहारांवर वर्चस्व राखू शकतील. तसे झाल्यास जगातील कोणतीही शक्ती आमचे राज्य रोखू शकणार नाही.   

त्यांनी  शीख संघटनांना एकीचे आवाहन केले. शीख गुरूंनी प्रतिपादन केलेल्या बादशाहत किंवा राज या संकल्पनेचा त्यांनी ऊहापोह केला.  आम्हाला सच्चा खालसा व्हावे लागेल, असे ते म्हणाले.