उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी अलिगढ विमानतळाला कल्याण सिंह यांचं नाव देण्यात येईल, असे संकेत योगी आदित्यनाथ यांनी दिले.

अलीगढमध्ये पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “आज, आम्ही कल्याण सिंह यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अलीगढच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये आणले आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहता यावे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कल्याण सिंह वर्षानुवर्षे अलीगढच्या लोकांशी जोडले गेले होते.”, असे आदित्यनाथ म्हणाले.

“कल्याण सिंह कट्टर रामभक्त म्हणून ओळखले जातात. विमानतळापासून अलिगढपर्यंत उत्तर प्रदेशातील लोकांचा त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भगवान रामाने आम्हाला शक्ती प्रदान करावी, अशी मी प्रार्थना करतो,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. यावेळी अलीगढ विमानतळाला कल्याण सिंह यांचं नाव देण्यात येईल का, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की, “याबद्दल चर्चा करण्यासाठी लवकरच आम्ही कॅबिनेट बैठक घेणार आहोत. कल्याण सिंह यांनी मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशमधील गरीब जनतेसाठी अनेक विकासकामे केली. ते कोणत्याही एका विशिष्ट जात किंवा समुदायाचे नेते नव्हते,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

कल्याण सिंह यांच्या निधनानंतर, अलीगढमधील भाजप नेत्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या मिनी विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती मिळतेय.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री लखनऊ येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह यांनी भारतीय जनता पक्षामध्ये असताना राज्यात आणि केंद्रात अनेक महत्वाची पदे भूषवली. ते राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले होते.

कल्याण सिंह यांच्यावर त्यांच्या नरौरा या मूळ गावी रामघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कल्याण सिंह यांचे निधन झाल्यापासून त्यांच्या पार्थिवासोबतच आहेत.