मध्य प्रदेशमधील राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर राजकीय संकट ओढावल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील २० मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपला राजीनामा सादर केला आहे. शिवाय कमलनाथ यांना मंत्रिमंडळ पुनर्चनेसाठी मंत्र्यांनी अधिकारही दिले  आहेत.

कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याचे दिसत आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होणार का? की पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांचे सरकार येणार आणि ज्योतिरादित्य त्यांना पाठिंबा देणार? या चर्चांना उधाण आलं आहे.  या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी काल  दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली होती.

मध्यप्रदेश सरकारमधले १७ आमदार हे बंगळुरूला गेले आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये ६ मंत्र्यांचाही समावेश आहे. तसंच हे सगळे सिंधिया यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशात राजकीय भूकंप होणार का? धुळवडीच्या दिवशीच राजकीय रंग उधळले जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी ११४ जागांसह काँग्रेस सत्तेत आहे. भाजपाच्या १०७ जागा आहे. बसपाच्या २, समाजवादी पक्षाची १ आणि चार अपक्ष आमदार असं सध्याचं राजकीय बलाबल आहे.