पीटीआय, बोलपूर : पशू तस्करीप्रकरणी तपासात असहकार्य केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनुब्रत मंडल यांना गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी अटक केली. सीबीआयने गेल्या काही दिवसांत मंडल यांना दोन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत ते उपस्थित राहिले नाही.

सीबीआयने तृणमूलच्या नेत्याला अटक करण्याअगोदर कलम ४१ नुसार नोटीस पाठवली होती. त्याअगोदर एक दिवसापूर्वी सीबीआयचे किमान आठ अधिकारी आणि केंद्रीय दलाबरोबर मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी झडती घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंडल यांची किमान एक तास चौकशी केली.

‘‘पशुतस्करी प्रकरणी चौकशीस असहकार्य केल्याबद्दल मंडल यांना अटक केली आहे. या घोटाळय़ात मंडल यांच्या सहभागाची माहिती मिळाली आहे. त्यांची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करू,’’ असेही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंडल यांना १४ दिवस आराम करण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येणार आहे, असेही सांगितले.

६२ वर्षीय मंडल हे तृणमूलचे बीरभूम जिल्हाध्यक्ष आहेत. सीबीआयने मंडल यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सैगल हुसैन यालाही अटक केली आहे. सत्ताधारी तृणमूलने सांगितले की, पक्ष घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. परंतु तृणमूल भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात तडजोड करणार नाही.