दिल्ली काबीज केल्यानंतर आता आपण देशातील सर्व राज्यांमध्ये विजय मिळवू, असे पक्षातील काहीजण बोलतात. मात्र, आपण विजयी मोहिमेवर निघालेले ‘नेपोलियन’ आहोत का?, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षात (आप) सुरू असलेल्या अंतर्गत उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मौन सोडले. योगेंद्र यादव आणि प्रशांत भुषण या ज्येष्ठ नेत्यांना आपच्या सर्वोच्च कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आल्यानंतर पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. परंतु, अरविंद केजरीवाल ‘आप’मधील या अंतर्गत दुफळीच्या मुद्द्यावर मौन बाळगून होते. मात्र, शनिवारी बंगळुरू येथील एका कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.  
आपल्याला व्यवस्था बदलायची आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ‘आप’ने चांगले सरकार आणि चांगली व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. एकदा का दिल्लीतील परिस्थिती बदलली की संपूर्ण देश बदलेल, असा विश्वास मला वाटतो. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी मिळून देशभरात दिल्लीचा आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास आपण देशात आणि जगभरात एका नव्या पद्धतीच्या राजकारणाचा पायंडा घालून देऊ, असा विश्वास यावेळी अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. पक्षातील अंतर्गत मतभेदांविषयी बोलायचे झाले तर, मी बहुतेकदा या सगळ्याशी झगडतच आलो आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ‘आप’ने दिल्ली सोडून इतर राज्यांत निवडणुका लढवायच्या का, या प्रश्नावरून सध्या आपमध्ये दोन गट पडले आहेत. ‘आप’ने राज्यनिहाय विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या अथवा लढवू नये, याचा निर्णय त्या राज्यातील ‘आप’च्या नेत्यांवर सोपवावा, असा प्रस्ताव योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षाच्या राष्ट्रीय निरीक्षकांना लिहलेल्या पत्रात मांडला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘आप’ने हरियाणा विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात, असे योगेंद्र यादव यांचे मत होते. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी हा प्रस्ताव हाणून पाडला होता.
‘आप’ने दिल्लीप्रमाणे इतर राज्यांतही निवडणुका लढवून विजय प्राप्त करावा, या मताचे समर्थन करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना दिल्लीतील विजयानंतर केजरीवालांनी सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. असे पाऊल उचलणे म्हणजे अहंकाराचे निदर्शक असल्याचेही केजरीवालांनी त्यावेळी सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal rejects aam aadmi party going national are we napoleon
Show comments