दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार आहे. १५ एप्रिलपर्यंत त्यांना तिहार तुरुंगात ठेवलं जाईल. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांची १५ दिवसांची कोठडी मागितली होती. राऊस अ‍ॅवेन्यू कोर्टाने ही मागणी मान्य केली आहे. अतिरिक्त महाधिवक्ते एस. व्ही. राजू हे ईडीकडून न्यायालयासमोर हजर होते. त्यांनी न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. कारण केजरीवालांनी चौकशीत कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर ‘मला माहिती नाही’ एवढंच उत्तर दिलं, असं ईडीने म्हटलं आहे.

ईडीला दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याचा तपास पुढे न्यायचा आहे. त्यामध्ये केजरीवाल यांनी सहकार्य करणं, इडीकडे असलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे. हे मुद्दे राजू यांनी न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

एस. व्ही. राजू म्हणाले, केजरीवाल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनचा पासवर्ड सांगण्यास नकार दिला. त्यांनी इतर कुठल्याही डिजीटल डिव्हाईसचे पासवर्ड दिले नाहीत. ते कुठल्याही प्रश्नाचं योग्य उत्तर देत नाहीयेत. ते केवळ उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर त्यावर ते मैं नहीं जानता (मला माहिती नाही) एवढचं उत्तर देत आहेत.

दरम्यान, केजरीवाल यांनी तुरुंगात त्यांच्याजवळ भगवद्गीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याची परवानगी मागितली आहे. तसेच ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ (How Prime Ministers Decide) हे पुस्तकदेखील त्यांना त्यांच्याजवळ हवं आहे. केजरीवाल तुरुंगातील १५ दिवसांमध्ये हे दोन ग्रंथ आणि पंतप्रधानांबाबतचं पुस्तक वाचतील. यासह त्यांनी तुरुंगात धार्मिक लॉकेट परिधान करण्याची परवानगी मागितली आहे. केजरीवालांनी त्यांची नियमित औषधं आणि विशेष डाएटचीदेखील मागणी केली आहे.

न्यायालयात हजर राहण्यापूर्वी केजरीवालांची पंतप्रधानांवर टीका

ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना आज न्यायालयासमोर हजर केलं. तत्पूर्वी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांनी केजरीवाल यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी केजरीवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी जे काही करतायत ते चुकीचं आहे.

हे ही वाचा >> “भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

केजरीवाल यांना तिहार तुरुंगात नेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यांना तिहारमधील कोणत्या तुरुंगाती कोणत्या बराकीत ठेवलं जाणार यावर ईडीचे अधिकारी, तुरुंग व्यवस्थापन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे. तिहारमध्ये एकूण ९ तुरुंग आहेत. या ९ तुरुंगांमध्ये सध्या एकूण १२,००० कैदी शिक्षा भोगत आहेत.