प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. यावेळी साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांच्या डोळ्यात पाणी आलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वाजून २९ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेला सुरुवात केली. त्यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवतही होते. आज कारसेवकांचं बलिदान सार्थकी लागलं असून संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा हा दिवस असल्याचं साध्वी ऋतंभरा यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या साध्वी ऋतंभरा?

“आज प्राणप्रतिष्ठेचा शुभ क्षण आला आहे. हा एक मंगल दिवस आहे. आज प्रभू रामाच्या स्वागतासाठी सगळा भारत सजला आहे. जगात उत्सव सुरु आहे. कारसेवकांचं बलिदान सार्थकी लागलं आहे. तपस्वींनी जो त्याग केला त्याचं फळ आज मिळालं. प्रतीक्षा आणि धैर्य यांची परिणीती म्हणजे हे राम मंदिर आहे. रामलल्ला आले आहेत आता सगळं मंगलमय होईल” असं म्हणत साध्वी ऋतंभरा यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा त्यांच्या आणि उमा भारतींच्या डोळ्यात पाणी आलं.

राम मंदिर आंदोलनात उमा भारतींचा सिंहाचा वाटा

अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं पाहिजे यासाठी जे आंदोलन उभं राहिलं त्यात उमा भारती यांचाही मोठ्या प्रमाणावर पुढाकार होता. रथयात्रेच्या आंदोलनाने त्यांना देशपातळीवर एक आक्रमक नेत्या म्हणून ओळख दिली. राम मंदिर झालं पाहिजे यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन, त्यांची भाषणं ही आजही चर्चेत असतात. आज राम मंदिर उभं राहून त्यात जो प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला ते पाहून साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती या दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. विश्व हिंदू परिषदेच्या प्रत्येक सभेत उमा भारती भाषण करत असत. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यातल्या नेत्यांपैकी उमा भारतीही एक होत्या. कारसेवकांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावला गेला. मात्र राम मंदिर आंदोलनामुळे भाजपातला एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांना ओळख दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya temple mandir inauguration 22 january uma bharti and sadhvi ritambhara became emotional scj
First published on: 22-01-2024 at 13:47 IST