पीटीआय, नवी दिल्ली

योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी बिनशर्त आणि विनाअट माफी मागितली. पतंजलिच्या उत्पादनांच्या औषधी गुणधर्मावियी मोठमोठे दावे करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल ही माफी मागण्यात आली आहे.

गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या निवेदनाचे उल्लंघन केल्याबद्दल, योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी दोन स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे सादर करून विनाअट माफी मागितली. पतंजलि आयुर्वेदची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी, यापुढे विशेषत: त्यांनी निर्मिती आणि विपणन केलेल्या उत्पादनांची जाहिरात किंवा ब्रँिडगशी संबंधित कायद्याचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, तसेच त्यांच्या वैद्यकीय गुणधर्माविषयी किंवा कोणत्याही उपचारपद्धतीच्या विरोधात माध्यमांमध्ये कोणत्याही स्वरूपाची सहज विधाने केली जाणार नाहीत अशी हमी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. पतंजलिवर या हमीचे पालन करणे बंधनकारक आहे असे न्यायालयाने बजावले होते.

हेही वाचा >>>छत्तीसगडमधील माओवाद्यांनी बंद केलेले राम मंदिर २१ वर्षांनी खुले

मात्र, या हमीचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने त्यांना माफी मागितण्यास सांगितले होते. ही माफी पुरेशा गांभीर्याने मागितलेली नाही यामुळे संतप्त सर्वोच्च न्यायालयाने २ एप्रिलला दोघांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी मंगळवारी बिनशर्त आणि विनाअट माफी मागितली.