पाकिस्तानातील बालकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाले आहेत. केंद्र सरकारने बुधवारी संसदेत ही माहिती दिली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. काँग्रेस खासदार अहमद पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने ही माहिती दिली.

जैशच्या बालाकोटमधील दहशतवादी तळावर हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. “दहशतवादी गट भारताविरोधात धार्मिक आणि जिहादी कार्यक्रम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहेत” असे सरकारने सांगितले.

“भारताच्या अखंडतेसाठी आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत” असे सरकारकडून सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बालाकोटमधील जैशचे तळ सक्रीय झाल्याची माहिती दिली होती. ५०० दहशतवादी घुसखोरीसाठी तयार असल्याचे रावत म्हणाले होते.