बलुचिस्तानमध्ये सध्या बिघडत असलेल्या वातावरणामुळे तेथील लोक भारताकडे मदत मागत आहेत. ‘बलुच रिपब्लिकन पार्टी’चे नेता बरहुमदाग बुगती यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचच्या मुद्यावर हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे. बरहुमदाग बुगती हे रविवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, ‘आमची इच्छा आहे की भारताने आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याबाबत चर्चा करावी.’ यावेळी त्यांनी बांगलादेशचे उदाहरण दिले.
बांगलादेशाला विभक्त करण्यासाठी जशी भारताने भूमिका घेतलेली तशीच भूमिका बलुचिस्तानसाठीही घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले. ‘पाकिस्तान आम्हाला आतंकवादी बोलतात. ते म्हणतात की आम्हाला भारताकडून सहकार्य मिळत आहे. ती लोकं आमच्यावर कायमच नजर ठेवून असतात. जर तुम्ही लिबिया आणि सिरिया यांच्यामध्ये हस्तक्षेप करु शकतात तर पाकिस्तानमध्ये का नाही? लोकांना माहित नाहीए की इथले वातावरण किती गंभीर झाले आहे. इथली लोकं आपली घरे सोडून जात आहेत.’
बरहुमदाग हे बलुचिस्तानचे प्रसिद्ध दिवंगत नेते अकबर खान बुगती यांचे नातू आहेत. ‘बलुचिस्तानचे लोक नेहमीच पाकिस्तानच्या लष्करापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पाकिस्तानचे लष्कर आमच्या गावांवर बॉम्ब हल्ले करतात. ते आम्हाला आतंकवादी समजतात आणि त्यांच्यामते आम्हाला भारत आणि नाटोकडून पाठिंबा मिळतो. पाकिस्तानी लष्कराचा हा छळ गेल्या पाच वर्षांपासून वाढला आहे. हे मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत सुरु झालेले आणि अजूनपर्यंत सुरु आहे,’ असे बरहुमदाग यांनी एएनआयला सांगितले.
पाकिस्तानला हवा आहे चीनचा पाठिंबाः
बरहुमदाग हेही म्हणाले की, चीनकडे असे तंत्रज्ञान आहे जे पाकिस्तानकडे नाहीए, यासाठीच पाकिस्तानला चीनचा पाठिंबा हवा आहे.