मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. मोदींनी भाषणासोबत कामही केले असे सांगत बिल गेट्स यांनी नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे कौतुक केले. मोदींनी अशी समस्या मांडली ज्यावर आपण सार्वजनिक स्तरावर बोलण्यास धजावत नाही असे गेट्स यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानावर बिल गेट्स यांनी ब्लॉगमधून भाष्य केले आहे. या ब्लॉगमध्ये गेट्स यांनी मोदींच्या अभियानाचे भरभरुन कौतुक केले. गेल्या तीन वर्षात सरकारने स्वच्छता आणि उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रमाण करण्यासाठी उचललेली पावले कौतुकास्पद आहेत असे गेट्स म्हणालेत. मोदींनी जनआरोग्याच्या दृष्टीने धाडसी विधान केले होते. एखाद्या निर्वाचित सदस्याकडून अशा स्वरुपाचे विधान खूप कमी वेळा ऐकतो असे सांगत गेट्स यांनी मोदींच्या तीन वर्षांपूर्वीच्या लाल किल्ल्यावरील भाषणाची आठवण करुन दिली. गेट्स यांनी मोदींच्या भाषणातील महत्त्वाचा भाग ब्लॉगमध्ये मांडला. आपण २१ व्या शतकात राहतो. आपल्या माता-बहिणी उघड्यावर शौचासाठी जातात. आपल्याला यावरुन कधी खंत वाटत नाही का?, असे गेट्स यांनी नमूद केले.

पंतप्रधानसारख्या मोठ्या पदावर असताना एखाद्या नेत्याने हा मुद्दा मांडल्याचे मला आठवत नाही. मोदींनी फक्त भाषण केले नाही तर त्यादिशेने कामही केले असे गेट्स यांनी आवर्जून नमूद केले. २०१४ मध्ये स्वच्छ भारत मोहीम सुरु झाली होती. त्यावेळी फक्त ४२ टक्के लोकांनाच शौचालयाची सुविधा होती. पण आता हे प्रमाण ६४ टक्क्यांवर आले आहे. २०१९ मध्ये महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीला हे प्रमाण १०० टक्क्यांवर नेण्याचा सरकारचा मानस आहे असे त्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांना कोणत्या राज्य या कामात पिछाडीवर आहे आणि कोणत्या राज्य आघाडीवर आहे हे माहित आहे. यासाठी अशी सक्षम यंत्रणा उभारण्यात आल्याचे सांगत गेट्स यांनी मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक केले.

बिल गेट्स यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ‘टॉकींग टॉयलेट’ हा व्हिडीओदेखील शेयर केला आहे. यात सरकारी योजनेची माहिती देण्यात आली आहे. लोकांनी शौचालयाचा वापर करावा यासाठी सरकार आवाहन करत असून यात सरकार गुगलचीही मदत घेणार असल्याचे गेट्स यांनी सांगितले. मोदींनी या कामात जनजागृती मोहीम राबवण्यासाठी स्टार क्रिकेटर आणि आघाडीच्या सिनेकलावंताचा खुबीने वापर केला अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले.