प्रख्यात शहनाईवादक दिवंगत बिस्मिल्ला खॉं यांच्या कुटुंबियांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. मोदी वडोदराबरोबरच वाराणसीमधूनही लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यावर सूचक म्हणून बिस्मिल्ला खॉं यांच्या परिवारातील व्यक्तीची स्वाक्षरी घ्यावी, अशी रणनिती भाजपने आखली होती. मात्र, तूर्ततरी त्याला यश मिळाले नसल्याचे दिसते आहे.
बिस्मिल्ला खॉं यांचे चिरंजीव झमिन हुसेन यांनी मोदी यांचे सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचे समजते. आमच्या कुटुंबाला कोणत्याही राजकारणात पडायचे नाही, असे त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार देताना सांगितले.
वाराणसीमधील मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीच बिस्मिल्ला खॉंय यांच्या कुटुंबियांपैकी कोणाची तरी सूचक म्हणून स्वाक्षरी घ्यावी, यासाठी भाजप प्रयत्नशील होता. वडोदरामधून निवडणूक अर्ज भरताना मोदी यांच्या अर्जावर एका चहा विक्रेत्याची सूचक म्हणून स्वाक्षरी घेण्यात आली आहे.



