नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पुढील तीन आठवडय़ांमध्ये जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या निवडणूक तयारीलाही वेग आला आहे. केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे सुरू झाले असून राज्या-राज्यांतील पक्षाच्या संघटनात्मक नियोजनाचा आढावा घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला असून केंद्रीय मंत्री अमित शहा शनिवारी राजस्थानचा क्लस्टर दौरा करणार आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह २७ ते २९ फेब्रुवारीदरम्यान आंध्र प्रदेश, बिहार आणि आसामचा क्लस्टर दौरा करणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांना वेगवेगळय़ा राज्यांमध्ये जाऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यामध्ये तीन-चार लोकसभा मतदारसंघांचा क्लस्टर तयार करण्यात आला आहे. 

हेही वाचा >>>गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार! शुभकरनच्या मृत्यूमुळे संतप्त शेतकऱ्यांचा ‘काळा दिवस’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मार्च रोजी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. बुधवारी  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना पुढील १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून प्राधान्यक्रम ठरवण्याची सूचना केल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा १३ मार्चनंतर घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची निवडणूक तयारी अखेरच्या टप्प्यात असून सर्व राज्यांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. निवडणूक आयुक्त राज्यांचे दौरे करत असून काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.

१६१ जागांवर लक्ष केंद्रित

केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे पूर्ण झाल्यानंतर भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेल्या १६१ लोकसभा मतदारसंघांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. तसेच, उत्तर प्रदेशमधील कठीण मतदारसंघांतील उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp election preparations speed up for upcoming lok sabha elections amy
First published on: 24-02-2024 at 03:05 IST