पीटीआय, चंदीगड

शेतकरी आंदोलकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर पंजाब सरकार गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत शुभकरन सिंग याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा दिल्ली चलो आंदोलनातील शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. हरियाणा पोलिस आणि पंजाबच्या शेतकऱ्यांमधील संघर्षांत शुभकरन सिंग याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, हरियाणा पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारी काळा दिवस पाळला. यावेळी शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांचे पुतळे जाळले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुभकरन सिंग याच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि त्याच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, शुभकरनच्या कुटुंबीयांवर अंत्यसंस्कारांच्या सहमतीसाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>>“वाराणसीत तरुणांना नशेत नाचताना पाहिलं”, राहुल गांधीच्या टीकेवर मोदींचा पलटवार; म्हणाले, “जे स्वतः…”

‘दिल्ली चलो मोर्चा’तील ६२ वर्षीय शेतकरी दर्शन सिंग यांचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पंजाब-हरियाणा सीमेवर खनौरी येथे त्यांचा मृत्यू झाला. दर्शन सिंग भटिंडा जिल्ह्यातील अमरगड गावचे रहिवासी असल्याची माहिती शेतकरी नेते सरवण सिंग पंढेर यांनी दिली. या आंदोलनादरम्यान झालेला हा तिसरा मृत्यू आहे.