नॉयडा : सध्याच्या सरकारवर सामान्य लोकांचा विश्वास असून आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारपुढे कुठलेही आव्हान नाही, आमचेच सरकार पुन्हा येईल असे मत केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका हे भाजपसाठी मोठे आव्हान आहे काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, सरकारपुढे कुठलेही आव्हान नाही.

कोलकाता येथे महागठबंधन मेळाव्यात करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर विचारले असता ते म्हणाले की, भाजप पुन्हा सत्तेवर येण्याच्या भीतीने विरोधक एकत्र येत आहेत. भाजप पुन्हा सरकार बनवील या भीतीने त्यांना ग्रासले असून लोक आमच्या बाजूने आहेत याची आम्हाला खात्री आहे.

आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लोकप्रिय नेतृत्व असून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याने त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द केल्याबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा आणला असून त्यात मोठय़ा गुन्हेगारांना देशात आणण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे.

चोकसी याला भारतात आणले जाईलच शिवाय कुणाची गय केली जाणार नाही, सर्वावर कारवाई होईल.

‘भ्रष्टाचाराचा एकही गंभीर आरोप नाही’

आमच्या सरकारवर गेल्या साडेचार वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही गंभीर आरोप झालेला नाही, मागील काँग्रेस सरकारांच्या काळात सगळीकडे भ्रष्टाचार होता. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक मोठी प्रकरणे बाहेर आली.