पीटीआय, नवी दिल्ली

मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गजाआड पाठवण्याचे कारस्थान भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने रचले, असा आरोप ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी केला.

या प्रकरणातील आरोपी व नंतर माफीचे साक्षीदार झालेले राघव मागुंता यांच्यावर केजरीवाल यांच्याविरुद्ध खोटा जबाब देण्यासाठी भाजप दबाव टाकत आहे, असा आरोप तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दोन दिवसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंह यांनी केला.

राघव मागुंता यांचे वडील आणि वायएसआर काँग्रेसचे लोकसभेतील खासदार मागुंता श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध १६ सप्टेंबर २०२२ रोजी कारवाई करण्यात आली होती, असे या प्रकरणात अटक करण्यात आलेले सिंह म्हणाले.

हेही वाचा >>>काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !

‘केजरीवाल यांच्याविरुद्ध खोटा जबाब देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. मात्र त्यांनी हे नाकारले, तेव्हा त्यांचा मुलगा राघव रेड्डी याला अटक करण्यात आली. सतत प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या, तेव्हा राघव याने जबाब बदलून केजरीवाल यांच्याविरुद्ध जबाब दिला आणि एका मोठय़ा कारस्थानाचा भाग झाला’, असा आरोप सिंह यांनी केला. केजरीवाल यांचे जीवन प्रामाणिक आहे, मुलांना चांगले शिक्षण देणे आणि दिल्लीच्या लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा प्रदान करणे हे त्यांचे ध्येय आहे अशी प्रशंसाही सिंह यांनी यावेळी केली.

हेही वाचा >>>३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

भाजपचा आक्षेप

सिंह यांच्या आरोपांनंतर भाजपने त्यांच्यावर जामीन शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांना ज्या दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याबद्दल ते बोलणार नाहीत अशी अट असतानाही त्यांनी यासंबंधी काही विधाने केली. त्यामुळे त्यांच्या या कृतीचे गंभीर परिणाम होतील असा इशारा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिला.

सिंह हे केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया या इतर आरोपींनाही ‘क्लीन चिट’ देत आहेत असा आक्षेप भाटिया यांनी घेतला. ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी तथ्यात्मकदृष्टय़ा चुकीची विधाने करत आहेत असे ते म्हणाले.

(संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर आरोप केले, तसेच आपले सहकारी निरपराध असल्याचाही दावा केला.)