भोपाळच्या हुजूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार रामेश्वर शर्मा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आले आहेत. सागर जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान हिंदुत्वावर भाषण देताना जोधा-अकबर यांच्यात प्रेम विवाह नव्हता. उलट सत्तेसाठी मुलीला पणाला लावले होते असे विधान त्यांनी केले आहे. रामेश्वरचे हे विधान आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

“जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात आणि सत्तेसाठी आपल्या मुलीला पणाला लावतात, तेव्हा अशा दरोडेखोरांपासून सावध रहा जे तुमचे आहेत पण धर्माचा विश्वासघात करू शकतात,” असेही रामेश्वर यांनी म्हटले आहे. व्हिडिओमध्ये रामेश्वर शर्मा यांनी जोधा-अकबर यांच्यातील प्रेमविवाह नाही, तर सत्तेसाठी मुलीला पणाला लावण्यात आल्याचे म्हटले आहे.

 “जोधाबाई-अकबर यांच्यात काही प्रेम होते का? हे दोघे कोणत्याही महाविद्यालयात भेटले का? ते कॉफी हाऊसमध्ये भेटले का? जीममध्ये भेटले? जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात तेव्हा सत्तेसाठी आपल्या मुलीला पणाला लावतात. तेव्हा अशा दरोडेखोरांपासून सावध रहा जे तुमचे आहेत पण धर्माचा विश्वासघात करू शकतात,” असे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रामेश्वर शर्मा यांनी म्हटले आहे.

रामेश्वर शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर आता राजपूतांनी नाराजी व्यक्त केली आहे. रामेश्वरांच्या या विधानामुळे राजपूत समाज प्रचंड संतापला आहे. राजपूतांविषयीच्या त्यांच्या वक्तव्यानंतर जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी “हिंदू धर्म केवळ क्षत्रिय महाराणा प्रताप आणि छत्रसाल सारख्या राजपुतांमुळे सुरक्षित राहिला आहे, ज्यांनी मुघलांसमोर नतमस्तक न होता, तलवारीने दोन हात केले. आम्हाला त्यांचा अभिमान आहे,” असे म्हटले. दुसरीकडे, जोधाबाईंचे वडील मानसिंग यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, ज्यांनी समाज आणि देशाची फसवणूक केली, त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा.

दरम्यान, नंतर वाद वाढताना पाहून रामेश्वर शर्मा यांनी निवेदन जारी करून माफी मागितली आहे. जर त्यांच्या वक्तव्यामुळे कोणाला दुखावले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करत आहे, असे त्यांनी म्हटले.