बसपाच्या नेत्या मायावतींचा आरोप

लखनऊ : विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यातील सरकार भाजप उलथून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बसपाच्या नेत्या मायावती यांनी गुरुवारी येथे केला.  जे पक्षांतर करीत आहेत त्यांचे सदस्यत्व रद्द करणारा कडक कायदा करावा, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.

कर्नाटक आणि गोव्यातील राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मायावती यांनी वरील आरोप केला आहे. कर्नाटकमधील सत्तारूढ काँग्रेस-जेडीएसच्या १० आमदारांनी राजीनामा दिला आहे तर गोव्यातील काँग्रेसच्या १० आमदारांनी सत्तारूढ भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पैशांचा वापर आणि ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजप केंद्रात पुन्हा सत्तेवर आला, मात्र आता भाजपने विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमधील सरकार उलथून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, कारण या राज्यांमध्ये २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. बसपा याचा निषेध करीत आहे, असे मायावती यांनी ट्वीट केले आहे.

ज्या पद्धतीने भाजप पैसा आणि सत्तेचा वापर करून कर्नाटक आणि गोव्यामध्ये आमदार फोडण्याचा प्रयत्न करीत आहे तो लोकशाहीवरील डाग आहे, त्यामुळे जे पक्षांतर करतील त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कडक कायदा करण्याची वेळ आली आहे, असेही त्या म्हणाल्या.