आग्र्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद सामरिया यांना २०१४ पासून रेल्वेने ६ नोटिसा बजावल्या आहेत. १२ लाख रुपयांची थकित रक्कम वसूल करण्यासाठी सामरिया यांना रेल्वेकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत. सामरिया यांनी २०१४ मध्ये भाजप कार्यकर्त्यांना फतेहपूर सिक्रीहून लखनऊला आणण्यासाठी ट्रेन आरक्षित केली होती. २०१४ मध्ये लखनऊमध्ये नरेंद्र मोदी यांच्या ‘विजय शंखनाद’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण ट्रेन आरक्षित करण्यासाठी १८.४ लाख रुपये आकारले जाणार होते. यातील ५ लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करण्यात आले होते. भाजप नेते विनोद सामरिया यांना त्यावेळी पक्षाच्या निधीतून ही रक्कम भरली होती. यानंतर रेल्वे गाडी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी चार स्थानकांवर थांबवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने या प्रकरणी ३०.६८ लाख रुपयांची मागणी केली. सामरिया यांनी भरलेली आगाऊ रक्कम वजा केल्यानंतर अद्याप १२.३ लाख सामरिया यांच्याकडे रुपये थकलेले आहेत. थकित रक्कम पक्षाने भरावी, अशी अपेक्षा सामरिया यांनी व्यक्त केली आहे. मात्र ११ मे रोजी रेल्वेकडून आणखी एक नोटिस बजावण्यात आल्याने सामरिया चिंताग्रस्त आहेत.

‘ट्रेन माझ्या नावाने आरक्षित करण्यात आली होती,’ असे भाजपचे फतेहपूर सिक्रीचे माजी अध्यक्ष विनोद सामरिया यांनी सांगितले. ‘मी एक शेतकरी आहे आणि इतकी रक्कम भरणे मला शक्य नाही. यासाठी पक्षाच्या नेत्यांना वारंवार विनंत्या करुनही मला फक्त आश्वासने मिळाली. पक्षाने थकित रक्कम न भरल्यास रेल्वेकडून माझ्या संपत्तीवर जप्ती येईल, अशी भीती वाटते,’ असे सामरिया यांनी सांगितले.

वाचा- तेजस एक्स्प्रेसमध्ये आता स्वस्तातले हेडफोन

‘दिल्लीत ‘आपले सरकार’ असल्याने कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे मला राज्यातील नेत्यांनी सांगितले आहे,’ असे विनोद सामरिया यांनी म्हटले. या प्रकरणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची भेट घेतल्याची माहिती सामरिया यांनी दिली. याप्रकरणी विनोद सामरिया यांनी भेट आपली भेट घेतल्याचे भाजपचे आग्र्याचे अध्यक्ष शाम भादौरिया यांनी सांगितले. ‘मागील जिल्हाध्यक्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणावर सध्या काम करत आहे,’ असे भादौरिया यांनी सांगितले.