चेक बाऊंस प्रकरणात बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत दिल्लीच्या स्थानिक कोर्टाने त्याला ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच एकूण सात प्रकरणांतील मिळून ११ कोटी २ लाख रुपयांचा दंड ठोठावला. शिक्षा सुनावल्यानंतर राजपालला तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला. सात विविध खटल्यांमध्ये राजपाल यादवला प्रत्येकी १.६० कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयाविरोधात राजपाल दिल्ली हायकोर्टात अपिल करणार आहे.

राजपाल यादवच्या चेक बाऊंस प्रकरणात १४ एप्रिल रोजी देखील कोर्टात सुनावणी झाली होती. कडकड्डूम्मा कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश अमित अरोडा यांनी राजपालला चित्रपट निर्मितीच्या नावाखाली ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न देता तुरुंगवासाच्या शिक्षेसह दंड सुनावला.

कोर्टाने फसवणूक प्रकरणी राजपालसह त्याच्या पत्नीलाही दोषी ठरवले आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत त्याची पत्नी राधा यादव विरोधात प्रत्येक खटल्यात १० लाख रुपये दंड ठोठावला होता. जर राजपाल आणि त्याच्या पत्नीने दंडाची रक्कम दिली नाही तर सहा महिन्यांत त्यांच्या शिक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. यापूर्वीही वेगळ्या प्रकरणात राजपालला तुरुंगावास भोगावा लागला आहे. २०१३ मध्ये बनावट कागदपत्रे जमा केल्याच्या कारणाने त्याला दिल्लीच्या तिहार जेलची हवा खावी लागली होती.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या लक्ष्मी नगरमधील मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने अभिनेता राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, राजपालने एप्रिल २०१० मध्ये ‘अता पता लापता’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी या कंपनीकडे आर्थिक मदत मागितली होती. त्यानंतर या कंपनीने राजपालला ५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्ज प्रकरणात दोघांमध्ये कायदेशीर करारही झाला होता. यात राजपालला ८ टक्के व्याजदराने कर्जाची रक्कम चुकवायची होती. दरम्यान, राजपाल पहिल्या टप्प्यात ही रक्कम भरू शकला नाही. त्यानंतर तीन वेळा या कराराचे नुतनीकरण करण्यात आले. शेवटच्या करारानुसार, कंपनीने राजपालला सुमारे ११ कोटी रुपये परत करण्यास सांगितले. मात्र, ही रक्कमही राजपाल परत करु शकला नव्हता. त्यामुळे अखेर कंपनीने त्याच्यावर फसवणूकीचा खटला दाखल केला.