बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता मधुर भंडारकर यांनी बॉलिवूडमधील एका गटाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचं पहावत नसल्याचा खुलासा केला आहे. यामध्ये अनेक अभिनेते, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पाहण्याची यांची इच्छा नाही. छत्तीसगडमधील भिलाई येथील एका कार्यक्रमात बोलताना मधुर भंडारकर यांनी हा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, जेव्हा २०१४ लोकसभा निवडणूक होत होती, तेव्हा चित्रपटसृष्टीत दोन गट पडले होते. जवळपास ४० ते ५० सेलिब्रेटी नरेंद्र मोदींच्या विरोधात एकवटले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी या सर्वांचा प्रयत्न सुरु होता.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मोदीविरोधी सेलिब्रेटींनी गट तयार करत विरोध करण्यास सुरुवात केली. याविरोधात अजून एक गट तयार झाला ज्यामध्ये अनुपम खेर यांच्यासारखे लोक सहभागी झाले. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भिलाई येथे अभिनय कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी पोहोचलेल्या मधुर भंडारकर यांनी यावेळी इंदू चित्रपटावरुनही निर्माण झालेल्या वादावरही स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, ‘हा चित्रपट फक्त सहा कोटींमध्ये तयार झाला होता. अशामध्ये या चित्रपटाला भाजपाने स्पॉन्सर केल्याचा आरोप करणं खूपच हास्यास्पद होतं. इतक्या छोट्या बजेट चित्रपटाला भाजपाने आर्थिक सहाय्य केल्याचं म्हणणं खूपच हास्यास्पद आहे’. कधी गरज लागली तर मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी भाजपाची नक्की मदत घेईन असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.