‘आम्ही आमच्या चालक आणि प्रवाशांसोबत कुठल्याही जाती, धर्म, लिंग किंवा पंथाच्या आधारे भेदभाव करीत नाही’, असे कॅब सेवा देणाऱ्या ओला कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. एका प्रवाशाने मुस्लिम चालक असल्याने ओलाची कॅब रद्द केली होती. यासंदर्भात ओलाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अभिषेक मिश्रा नामक एका प्रवाशाने काही दिवसांपूर्वी ओला कॅब रद्द केली होती. कारण, या कॅबचा चालक एक मुस्लिम व्यक्ती होता. अभिषेकने कॅब रद्द केल्यानंतर अॅपवरील स्क्रीनशॉट काढून तो ट्विटरवर पोस्ट करुन त्याने लिहीले होते की, ‘मी माझे पैसे जिहादिंना देऊ इच्छित नाही’ अभिषेकचा ट्विट व्हायरल झाला. ती बाब ओला कंपनीच्या लक्षात आल्यानंतर ओलाने अभिषेकच्या ट्विटला ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले. त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, ‘आपल्या देशाप्रमाणे ओला देखील एक धर्मनिरपेक्ष व्यासपीठ आहे. आम्ही आमच्या चालक, प्रवाशी यांच्यामध्ये जाती, धर्म, लिंग किंवा पंथ यांच्या आधाराव भेदभाव करीत नाही. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना आणि चालकांना आग्रहाची विनंती करतो की, त्यांनी एकमेकांशी सन्मानाने वागावे.’

अभिषेकने आपले ट्विट बेंगळुरूच्या रेशमी नायर नामक मुलीच्या फेसबुक पोस्टला उत्तर देण्यासाठी केले होते. ज्यामध्ये रेशमीने भगवान हनुमानाचे पोस्टर लावलेल्या कॅबमधून प्रवास न करण्याबाबत लिहीले होते. रेशमीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले होते की, मी बलात्कारी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बलात्काऱ्यांचे पोट भरण्यासाठी आपले पैसे देणार नाही.

मुस्लिम कॅब चालकामुळे प्रवास रद्द करणारा अभिषेक मिश्रा हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असून त्याला ट्विटरवर अनेक केंद्रीय आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री फॉलो करतात.