बिहारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री प्रोफेसर चंद्रशेखर यांनी सीबीआय या तपासयंत्रणेबाबत मुक्ताफळं उधळली आहेत. सीबीआय पोपटाप्रमाणे नाही तर कुत्र्यासारखं काम करत असल्याची टीका चंद्रशेखर यांनी केली आहे. ‘भाजप भगाओ देश बचाओ’ या भाजपविरोधी रॅलीमध्ये आपण राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा फोटो घेऊन भाजपचा निषेध करणार असल्याचीही घोषणाही त्यांनी केली आहे.

लालूप्रसाद यादव हे देशातल्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत सीबीआयचा ससेमिरा त्यांच्यामागे लावून भाजप त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचंही चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. रविवारी बिहारमध्ये राजदची एक बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.  मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर हे मंत्री आहेत. त्यांनी आज मुक्ताफळं उधळत सीबीआय सरकारी कुत्र्याप्रमाणे काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. भाजपला बिहारमध्ये २७ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या भाजपविरोधी रॅलीची भीती वाटते आहे त्याचमुळे भाजपचे नेते जाणीवपूर्वक लालूप्रसाद यादव यांना त्रास देत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

बेहिशेबी मालमत्ता आणि बेकायदा जमीन प्रकरणी सीबीआयनं लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव, मुलगी मीसा भारती आणि पत्नी राबडीदेवी यांच्या जागांवर छापेमारी केली आहे. सीबीआयच्या छापेमारीमुळे तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्रीपद संकटात सापडलं आहे. इतकंच नाही तर नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यातूनही विस्तव जात नाहीये.

राजद आणि जदयू यांच्यात दरी पडल्यामुळे महाआघाडीचं भवितव्यही अंधारात सापडलं आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार हे मंगळवारपर्यंत दिल्ली दौऱ्यावर आहेत. सीबीआयनं यादव कुटुंबावर केलेल्या छापेमारीमुळे बिहारमधलं वातावरण ढवळून निघालं आहे. अशात आता बिहार सरकारमध्ये मंत्री असलेल्या प्रो. चंद्रशेखर यांनी सीबीआयबाबत वादग्रस्त वक्तव्य करत सीबीआयला कुत्र्याची उपमा दिली आहे. यामुळे चांगलाच वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.